धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण १६ प्रस्तावांवर राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, तापी जलवाहिनीच्या नूतनीकरणासाठी २२८ कोटी, पांझरा रिव्हर फ्रंटसाठी १०० कोटी तर सुरत बायपासलगत थीम पार्कसाठी आवश्यक जागा हस्तांतरित करण्यासह निधी देण्याचे आश्वासन राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. या बैठकीस आमदार अनूप अग्रवाल, मनपा आयुक्त अमिता दगडे-पाटील, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, नियोजन विभागाच्या सुमीता घाडगे, नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी धनंजय भागवत, तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
तापी जलवाहिनीचे नूतनीकरण
शहराला स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी तापी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनीचे नूतनीकरण करणे अत्यावश्यक बनले आहे. या कामासाठी सादर करण्यात आलेल्या २२८.०५ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळवून मंजुरी देण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे मंत्री मिसाळ यांनी सांगितले.
![]() |
- Advertisement - |
पांझरा रिव्हर फ्रंट प्रकल्प
शहरातील सौंदर्यवाढीसह पर्यावरण संतुलन साधण्यासाठी पांझरा नदीच्या काठावर 'रिव्हर फ्रंट' विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसाठी १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव महापालिकेने दिला असून, त्याला निधी मंजूर करण्याचे निर्देशही राज्यमंत्री मिसाळ यांनी दिले आहेत. या प्रकल्पात घाट बांधणी, जलपर्णी सफाई, पाणी साठवणुकीसाठी बंधारे, तसेच स्काय वॉक सारखी आधुनिक सुविधा उभारण्याचा समावेश आहे.
थीम पार्कसाठी सरकारी जमीन हस्तांतरण
धुळे शहरात पर्यटनवाढीच्या दृष्टीने थीम पार्क उभारण्याचा प्रस्तावही अंतिम टप्प्यात आहे. सुरत बायपासजवळील सव्हें क्र. ५१०/ड वरील १९ हेक्टर ६९ आर इतकी सरकारी जागा या प्रकल्पासाठी आरक्षित असून, ती महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी निधी देण्याचेही आश्वासन मंत्री मिसाळ यांनी दिले.
इतर विकास कामे
या बैठकीत स्टॉर्म वॉटर ड्रेनेजसाठी सादर करण्यात आलेल्या ५१३ कोटी रुपयांच्या प्रस्तावाची तांत्रिक तपासणी करून मंजुरी प्रक्रियेस गती देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच जीएसटी अनुदानात वाढ करून २८.५७ कोटी रुपये मिळावेत, मनपातील रिक्त पदांसाठी बिंदूनामावलीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात यावी, तसेच सव्हें क्र. ५२९ वरील आरक्षण रद्द करण्याबाबतही चर्चा झाली.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
आमदार अनूप अग्रवाल यांची भूमिका
या संपूर्ण प्रक्रियेत आमदार अनूप अग्रवाल यांनी सतत पाठपुरावा करून विकास प्रस्ताव शासनापर्यंत पोहोचवले. त्यांच्या प्रयत्नामुळेच या प्रस्तावांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
धुळे शहराच्या भविष्यकालीन विकासासाठी ही प्रस्तावित कामे अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, एकदा हे प्रकल्प प्रत्यक्षात आले की शहराच्या नागरी सुविधा, सौंदर्य, पर्यटन व अर्थकारण यामध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.
__________________________________